‘झाँसी कि रानी’ मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाईच्या व्यक्तिरेखेने प्रचंड लोकप्रियता लाभलेली अभिनेत्री उल्का गुप्ता आगामी ‘ओढ’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. ‘सोनाली एंटरटेनमेंट हाऊस’ निर्मित, ‘जी. एस. फिल्मस अकादमी प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ओढ.. The Attraction’ या मराठी सिनेमाची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली असून दिग्दर्शन दिनेश ठाकूर करीत आहेत.
मैत्रीला वयाचे बंधन नसतं पण समवयस्क मुलगा आणि मुलगी यांच्यातही निखळ मैत्री असू शकते यावर समाजाचा विश्वास बसत नाही. अशाच एका निर्मळ मैत्रीची कथा ‘ओढ’ या सिनेमामधून उलगडणार आहे. मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केतकर, जयवंत भालेकर सारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्यासाठी उल्का उत्साही असून या सिनेमाचे चित्रीकरण लातूर, तुळजापूर, ताकविकी परिसरात सुरु आहे. उल्का सोबत गणेश तोवर हा नवोदित अभिनेता या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. मोहन जोशींच्या मुलीच्या भूमिकेत आपल्याला उल्का यात पहायला मिळणार आहे. याआधी तिने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलंय. तेलगु, तमिळ, हिंदी, इंग्लिश भाषांवर प्रभुत्व असणारी उल्का गुप्ता सध्या मराठी भाषेचे धडे गिरवीत असून मराठी वाचनाचाही ती सराव करतेय.
‘ओढ’ चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक दिनेश ठाकूर यांचीच असून संवाद गणेश कदम यांनी लिहिलेत. चित्रपटातील गीते अभय इनामदार, संजाली रोडे, कुकू प्रभास, कौस्तुभ यांनी लिहिली असून त्यांना संगीत प्रवीण कुंवर यांनी दिलंय. ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर व्ही. एन. रेड्डी यांचे सुपुत्र रविकांत रेड्डी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करीत आहेत. स्वप्नील बांदोडकर, डॉ. नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ‘ओढ’ चित्रपटाची गीते गायली आहेत.