'ह्या गोजिरवाण्या घरात' लवकरच रंगभूमीवर

व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना सध्या सुगीचे दिवस आले आहे. उत्कृष्ट कथानक आणि नेपथ्य यांच्या जोरावर आज अनेक नाटकांनी मायबाप रसिकांच्या मनात आपली हक्काची जागा मिळवली आहे. त्यामुळेच तर अनेक कौटुंबिक नाटकांना देखील रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. असेच एक वेद प्रोडक्शन निर्मित आणि मुक्तायन प्रस्तुत  'ह्या गोजिरवाण्या घरात' हे कौटुंबिक नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे. 
मानस लयाळ लिखित या नाटकामध्ये  सुप्रिया पाठारे, साईकीत कामत आणि अदिती द्रविड हे तीन कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. छोटा पडदा गाजवणारे हे तिन्ही कलाकार 'ह्या गोजिरवाण्या घरात' या नाटकाच्या माध्यमातून प्रथमच एकत्र रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. 
'रात्रीस खेळ चाले'या मालिकेतून नावारूपास आलेला अभिराम म्हणजेच साईकीत कामत आजही लोकांच्या स्मरणात आहे. तर 'माझ्या  नवऱ्याची बायको' या झी टीव्हीवरील मालिकेतून अदिती आपले नशीब आजमावताना दिसून येत आहे. सुप्रिया पाठारे यांनादेखील अनेक मालिकेतून आणि चित्रपटातून पहिले असल्यामुळे ही तिकडी रंगभूमीवर काय धम्माल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  'ह्या गोजिरवाण्या घरात' या नाटकाच्या शीर्षकावरूनच चार भिंतीच्या आत घडणारे हे नाटक असल्याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. हे नाटक कौटुंबिक जरी असले तरी त्यात साई-पियुष या जोडीने सुरेख संगीताचा संगम देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रसिकांना नाट्यसंगीताचा आस्वाद देखील चाखता येईल. 
नवरा, बायको आणि आई असे तिघांचे दृष्ट लागेल असा संसार या नाटकात पाहायला मिळणार आहे. आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला हवी असलेली स्वतःची स्पेस आणि त्यामुळे वाढणारा नात्यातला गोडवा या नाटकाचा प्रमुख सार आहे. असे सारे काही आलबेल, गोंडस आणि गोजीरवाणे असतानाच या तिघांपैकी एकाच्या आयुष्यात अघटीत घडते, अनपेक्षित झालेल्या या आघाताचा परिणाम तिघांच्या जीवनावर आणि स्वाभाविकतः घरावर देखील होतो, अशावेळी हे कुटुंब स्वतःला कसे सावरते, हे सारे काही या नाटकात पाहायला मिळणार आहे. अंकुर काकतकर  दिग्दर्शित हे नाटक आजच्या आधुनिक कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे. गोपाल अलगेरी आणि तनुजा कुलकर्णी या नाटकाचे निर्माते असून, योगिता औरादकर या सहनिर्मात्या आहेत. २७ डिसेंबरपासून 'या गोजिरवाण्या घरात' या नाटकाच्या दौ-याला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे. 

Subscribe to receive free email updates: