जुन्या जमानातल्या विख्यात गायिका अभिनेत्री वंदना मिश्र यांच्या 'मी...मिठाची बाहुली' या पुस्तकाच्या अभिवाचनाचा रंगतदार प्रयोग २६ जानेवारीला बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हे पुस्तक म्हणजे गेल्या शतकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना मिश्र यांच नर्म आणि हळुवार आत्मकथन आहे. वंदना मिश्र यांच्या आयुष्याचा, रंगभूमीवरील त्यांच्या यशस्वी वाटचालीचा, त्यांना भेटलेल्या दिग्गजांचा, अनुभवलेल्या कठीण प्रसंगाचा, बदलत्या भोवतालाचा, साधा, सरळ पण रसरशीत जीवनप्रवास आहे. अनेक साहित्यिकांनी आणि वाचकांनी गौरविलेलं हे पुस्तक अधिकाधिक जाणकार रसिकांपर्यंत पोहोचावं हेच ध्येय ठेवून या पुस्तकाच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग श्री. विश्वास सोहोनी यांनी कलासुगंध, बोरिवली यांच्या सहयोगाने आयोजित केला होता.
अभिवाचनाची संकल्पना आणि दिग्दर्शन विश्वास सोहोनी यांचेच होते. या आत्मचरित्रातून वाचनासाठी संक्षिप्त संहिता तयार करण्याचे कठीण काम विश्वास सोहोनी यांनी अतिशय समर्थपणे पार पाडले आहे. उदय नेने आणि मानसी कुलकर्णी या कलाकारांनी तितक्याच ताकदीने वंदना मिश्र यांचा हा जीवनप्रवास त्यांच्या वाचनातून जिवंत केला असून श्रोत्यांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांनी पूर्णपणे व्यापलेल्या या काळात अभिवाचनासारखा कार्यक्रम म्हणजे एक अत्यंत दुर्मिळ योग. सुजाण श्रोत्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित फैय्याज बाईंनी आपले मनोगत व्यक्त करताना, ‘हे पुस्तक म्हणजे एका सत्वशील, निरागस पण मानी स्त्रीचे नितांत सुंदर आत्मचरित्र असून प्रत्येक अभिनेत्रीने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे’ असे आवाहन केले.
ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र यांनी आपल्या आईच्या पुस्तकाचे, 'एका वैभवशाली काळाचे सच्चे आणि हृदयस्पर्शी निवेदन' असे वर्णन केले. या कार्यक्रमाला कवियत्री नीता भिसे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अभिनेता अविनाश नारकर, समिक्षीका डॉ. मीना वैशंपायन, माधुरी नवरे, डॉ. रामदास गुजराथी असे मान्यवर रसिक उपस्थित होते. या प्रसंगी विश्वास सोहोनी यांनी, ‘अभिवाचनाचा हा उपक्रम आम्ही गेले वर्षभर यशस्वीरित्या राबवित असून श्रोत्यांचा ही आम्हांला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे’ असे आवर्जून नमूद केले.