प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं.. अस कितीही म्हटलं तरी बऱ्याचदा ते तसं कधीच नसतं.. हे सांगणारं ‘तुमचं आमचं सेम नसतं’ हे एक नवकोर विनोदी नाटक रंगभूमीवर येऊ घातलंय. ‘यश क्रिएशन’ आणि ‘परीस प्रॉडक्शन’ निर्मित या नाटकाची निर्मिती सौ. अर्चना निलेश चव्हाण आणि के.प्रतिमा करीत असून दिग्दर्शन नितीन कांबळे करताहेत. प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करण्याच्या उद्देशाने निर्मित ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नाटकाचे आकर्षण म्हणजे हरहुन्नरी विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करतोय.
दिग्दर्शक नितीन कांबळे यांनीच ‘तुमचं आमचं सेम नसतं’ नाटकाचे लेखन आणि गीत लिहिली आहेत. संगीत व पार्श्वसंगीताची साथ तृप्ती चव्हाण यांनी दिली असून गायक साईराम अय्यर, तृप्ती चव्हाण, करण यांनी ती गायली आहेत. या नाटकातून सिद्धार्थ पगारे, गौरी जोगळेकर, नितीन कुर्लेकर, कविता मगरे, आदित्य भालेराव, अभिजीत दुलगज आणि वरद चव्हाण हे कलाकार एकत्र आले आहेत. नेपथ्य अशोक पालेकर व हरीश आहीर करणार असून प्रकाश योजना अनिकेत कारंजकर, नृत्य – संतोष भांगरे, निर्मिती सूत्रधार - संजय कांबळे, संगीत संयोजन- विशाल बोरुलकर, रंगभूषा- किशोर पिंगळे, पोस्टर डिझाईन – केतन कदम व वेशभूषा संजय (बापू) कांबळे अशी इतर श्रेयनामावली आहे.
‘तुमचं आमचं सेम नसतं’चा शुभारंभाचा प्रयोग बुधवार १५ मार्चला सायं. ४:३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगणार आहे.