26 जुलै 1999... 18 वर्षांपूर्वी याच दिवशी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रयत्नांना यश आलं आणि भारताने कारगिल युध्द जिंकलं... तेव्हापासून 26 जुलै हा दिवस देशभरात ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वीरांप्रती कृतज्ञता म्हणून देशभरात कैक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
याच दिवसाचं औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी वीरता पुरस्कार प्राप्त सैनिक आणि शहिदांच्या परिवाराला सलाम करत त्यांचा सन्मान केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी दिलीपराव पाटील – निलांगेकर (कामगार मंत्री आणि माजी सैनिक कल्याण खात्याचे मंत्री) उपस्थित होते. तर सुभष देसाई (उद्योगमंत्री, महाराष्ट्र), डॉ. रजित पाटील (राज्य गृहमंत्री), जयकुमार रावल (पर्यटन मंत्री), वालसा नायर-सिंग (पर्यटन आणि संस्कृती विभाग सचिव) आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
याविषयी बोलताना अमृता फडणवीस यांनी शहीदांच्या परिवाराचे कौतुक करत त्यांचे आभार ही मानले. आपले आभार प्रदर्शन करताना त्या म्हणाल्या, “ज्यांनी आपल्या सगळ्यांचा आजचा दिवस सुखाचा व्हावा यासाठी आपल्या उद्याचं बलिदान दिलं अशा ह्या खऱ्या नायकांना माझा सलाम.”
तर अभिनेते अक्षय कुमार यांनी 18 व्या कारगिल विजय दिनानिमित्त सगळ्या सैनिकांना सलाम करत त्यांचे आभार मानले. या दिवसाचं महत्त्व जाणून आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे क्षय कुमार यांनी, ‘तुम्ही आहात, म्हणून आम्ही आहोत’ असेही म्हटले आहे.