सामाजिक जीवनातील स्थित्यंतराचे वेध आजवर अनेक चित्रपटामधून घेण्यात आले आहेत. हलाल या आगामी मराठी चित्रपटातून मुस्लिम स्त्रियांच्या व्यथेचा वेध घेण्यात आला आहे. ‘अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रदर्शनाआधीच कान्स फिल्म फेस्टिव्हल, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पुणे फिल्म फेस्टिव्हल,औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या अनेक राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटविलेल्या या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.
विवाह व तलाक या दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मुस्लिम स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नसल्याने याचा परिणाम त्यांच्या भावनांवर कशाप्रकारे होतो याचे परखड चित्रण हलाल मध्ये आहे. या चित्रपटाशी अनेक दिग्गज् मंडळी जोडली गेली आहेत. लेखक राजन खान यांच्या हलाला कथेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अमोल कागणे, लक्ष्मण कागणे यांनी केली आहे. यापूर्वी ‘अमोल कागणे फिल्म्सने ‘३१ ऑक्टोबर’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती.
चित्रपटाची कथा राजन खान यांची असून पटकथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणी रंजनदास, संकलन निलेश गावंड यांचं आहे. चित्रपटाची गीते सुबोध पवार व सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदरी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. गायक आदर्श शिंदे यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे. उच्च निर्मितीमूल्य, सशक्त आशय, कलाकारांची जमून आलेली भट्टी या सगळ्यांमुळे हलाल नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकेल.