हृदयांतरच्या सेटवर शामक दावरकडून विक्रम फडणीसला मिळाली नटराजाची मूर्ती!

गेली तीन दशकं सिनेसृष्टीत कोरिओग्राफर-गायक म्हणून नावारूपाला आल्यावर शामक दावर आता मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच नृत्यदिग्दर्शन करताना दिसणार आहेत. फॅशन डिझाइनर-दिग्दर्शक विक्रम फडणीस ह्यांच्या हृदयांतर ह्या पहिल्या मराठी चित्रपटातल्या एका गाण्यासाठी शामकने नृत्यदिग्दर्शन केलंय.
विक्रम फडणीस प्रॉडक्शनयंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) ह्यांच्या हृदयांतर ह्या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भुमिका आहेत. हृदयांतर हा एक भावनिक चित्रपट आहे.
विक्रम फडणीस सांगतात, शामक दावर माझ्या चित्रपटासाठी एक कॉन्सर्ट गाणं करतायत, ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच एक सन्मानाची बाब आहे. मी शामकला गेली 25 वर्ष ओळखतोय. आणि आता हा ऋणानुबंध एक पाऊल पूढे जाऊन एका चित्रपटात आम्ही एकत्र काम करतोय. शामक स्वत:च्याच भुमिकेत दिसेल. आम्ही नुकतंच ह्य़ा गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. आणि ते गाणं सुंदररित्या साकारलं गेलंय. जेव्हा शामकने मला सेटवर आल्यावर नटराजाची मूर्ती भेट म्हणून दिली. तेव्हा तर मला सुखद आश्चर्यांचा धक्काच बसला. नटराज पावित्र्याचं प्रतिक आहे. ही भेट चिरंतनकाळ माझ्या आठवणीत राहिल.
शामक दावर आणि विक्रम फडणीस ह्यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध असल्याकारणाने विक्रमच्या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन करणे, शामकसाठी चांगला अनुभव आहे. शामक दावर ह्याविषयी म्हणतात, जेव्हा विक्रमने फिल्मसाठी माझ्याकडे विचारणा केल्यावर मी लगेच त्याला होकार कळवला. माझ्या 30 वर्षांच्या करीयरमध्ये मी कधीही मराठी चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन केलं नव्हतं. मी नेहमीच बॉलीवूड सिनेसृष्टीमध्ये काम केलेले आहे. विक्रम माझा जवळचा मित्र आहे. आणि हा सिनेमा मी एक आव्हान म्हणून करायचा ठरवला. काहीतरी वेगळं करून पाहण्याची इच्छा यामागे होती. विक्रम नृत्यदिग्दर्शकाला पूर्ण मुभा देतो. त्यामुळे आपली कला मनमोकळेपणाने दाखवण्याचा अवसर कलाकाराला मिळतो.
हृदयांतर सिनेमाचे दुसरे शेड्युल नुकतेच मुंबईत पूर्ण झाले आहे.

Subscribe to receive free email updates: