रक्षाबंधन हा सण भावाबहिणीला प्रेमाच्या अतूट धाग्यात बांधणारा. संकटाच्या वेळी धावून जाण्याचे वचन भाऊ बहिणीला देतो खरं, पण आज मुलीसुद्धा भावाच्या कठीण प्रसंगात त्याचं रक्षण करतात. अशाच एका कणखर बहिणीने भावासाठी दाखवलेल्या धैर्याची गोष्ट खास रक्षाबंधनाच्या निमित्ताने…
'रक्षाबंधन' हा सण स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. भावा बहिणीचे नाते खूप वेगळे असते. राखीला साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन भाऊ आपल्या बहिणीला देतो त्याचप्रमाणे बहिणसुद्धा आपल्या भावाला सदैव सांभाळून घेण्याचं आश्वासन देत असते.आरती – द अननोन लव्हस्टोरी या आगामी मराठी चित्रपटाच्या मागे ही खऱ्या आयुष्यातील बहिण भावाच्या ऋणानुबंधाची एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे.
कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर उभं करतं की, आपल्यामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आधाराची खूप गरज असते. ‘आरती’ यासत्यघटनेवर आधारित सिनेमातून प्रियकर–प्रेयेसीच्या प्रेमासोबतच सनी पवार व सारिका मेणे या बहिण-भावाच्या रेशमी बंधाची कथा उलगडली जाणार आहे.
सनी यांच्यावर ओढवलेल्या एका दुर्देवी प्रसंगामुळे ते पूर्णपणे खचून गेले होते. आपला आत्मविश्वासही गमावून बसले होते. अशावेळी बहिण सारिका आपल्या भावाच्या मदतीला धावून आल्या आणि अतिशय अवघड क्षणी त्याच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. बहिणीने दिलेल्या या आधारामुळेच सनी यांनी त्या प्रसंगांवर मात केली. बहिणीने दिलेल्या या साथीमुळेच मला नव्याने स्वप्न पाहण्याचं बळ मिळाल्याचं सनी सांगतात. एकमेकांसाठी जगणं, एकमेकांचं समाधान, आनंद जपणं, भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवतात, असं सारिका मानतात. प्रेम आणि विश्वास याच्या भक्कम धाग्यात खूप ताकद असते. सारिका व सनी यांच्याकडे पाहिल्यानंतर ही गोष्ट नक्कीच जाणवते.