नामवंतांची उपस्थिती आणि शब्द-सुरांच्या सुरेल वातावरणात 'विठ्ठला शप्पथ’या आगामी मराठी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सिनेमाच्या म्युझिक टीमने संगीत निर्मितीचे उलगडलेले सुखद अनुभव तसेच कलाकारांनी सादर केलेल्या स्कीटसने या सोहळ्याची रंगत चांगलीच वाढवली. 'विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटातही सुमधुर गीतांची मेजवानी आहे. चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केला.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन आजवर अनेक चित्रपटांतून करण्यात आलं आहे. १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'विठ्ठला शप्पथ’ चित्रपटातून विठू माऊलीचं त्यांच्या भक्तांशी असलेलं अतूट नातं पहायला मिळणार आहे. गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांनी 'विठ्ठला शप्पथ’ चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे.
चांगल्या कथेच्या कॅनव्हासवर चित्रपटातील गीतांनी सुरेख रंग भरले आहेत. मंगेश कागणे व क्षितीज पटवर्धन या लोकप्रिय गीतकारांच्या शब्दांनी यातीलचारही गीते सजली असून चिनार-महेश या युवा संगीतकार जोडीचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. पंढरीच्या विठ्ठलाची महती सांगणारे,गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील ‘ठाई ठाई माझी विठाई’ तसेच आदर्श शिंदे यांनी गायलेलं ‘देव कोंडला’ हे भक्तीगीत प्रेक्षकांना समाधानाची अनुभूती देईल. स्वप्नील बांदोडकर व आनंदी जोशी यांच्या आवाजातील ‘बोले तुना तुना’ हे प्रेमगीत व ‘झक्कास छोकरा’ हे प्रवीण कुँवर यांनी स्वरबद्ध केलेलं धमालगीत नक्कीच ठेका धरायला लावणार आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक कंपनीने 'विठ्ठला शप्पथ’ चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत.
मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे,अंशुमन विचारे, केतन पवार, विजय निकम, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांसह विजय साईराज आणि कृतिका गायकवाड ही नायक–नायिकेचीनवी जोडी या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे.
१५ सप्टेंबरला 'विठ्ठला शप्पथ’ प्रदर्शित होणार आहे.