टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित आणि सुरेश पै सहनिर्मित 'सातारचा सलमान' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या सिनेमाचा नुकताच श्रीगणेशा करण्यात आला असून, नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी 'सातारचा सलमान' या नव्या कोरया सिनेमाचा मुहूर्त झाला, प्रकाश सिंघी यांची निर्मिती असलेला हा पहिलाच सिनेमा असून, आपल्या चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील पदार्पणाबद्दल ते भरभरून बोलतात. 'मी मूळचा नागपूरचा असून, मराठी भाषेसोबत माझी जन्मापासून नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे मनोरंजनक्षेत्रात उतरताना सर्वप्रथम मराठीतूनच सुरुवात करण्याची माझी इच्छा होती, ह्या सिनेमाद्वारे ती पुर्णत्वास येणार आहे'. असे ते सांगतात. टेक्सास स्टुडियोजच्या बॅनरखाली यानंतर हिंदी तसेच इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचीदेखील निर्मिती करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
हा सिनेमा आगामी वर्ष २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुर्तास, या सिनेमातील कलाकारांबाबत मौन बाळगण्यात आले आहे.
‘बघतोस काय मुजरा कर’ ह्या बहुचर्चित सिनेमानंतर हेमंत ढोमेचा हा दुसरा दिग्दर्शकीय सिनेमा आहे. हेमंतनेच लिहीलेला हा सिनेमा नक्कीच मनोरंजनाने परिपुर्ण असेल यात शंका नाही. पण 'सातारचा सलमान' नेमका कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.