प्रेक्षकांच्या जाणिवा व समाजभान जागृत करणाऱ्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. महिलांचा लैंगिक छळ हा आजच्या काळातला ऐरणीवरचा विषय आहे. घराबाहेर पडलेल्या स्त्रीची घुसमट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न आगामी निर्भया या मराठी चित्रपटातून झाला आहे. स्वानंदी प्रोडक्शन प्रस्तुत निर्भया हा मराठी सिनेमा येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती अमोल अहिरराव यांची असून दिग्दर्शन आनंद बच्छाव (साई आनंद) यांचं आहे.
निर्भयाच्या आयुष्यात घडणाऱ्या एका दुर्देवी घटनेमुळे तिचं आयुष्य उध्वस्त होतं. या दुर्देवी घटनेनंतर पोलिस तसेच राजकीय नेत्यांकडून दाद मागायला गेलेल्या निर्भयाच्या पदरी निराशा पडते. निर्भयाच्या आयुष्यात पुढे अशा काही घटना घडतात की, तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. या वळणामुळे निर्भयाच्या आयुष्याला कलाटणी मिळते का? हे सांगू पाहणारा चित्रपट म्हणजे निर्भया.
या चित्रपटात योगिता दांडेकर निर्भयाच्या मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबत स्मिता जयकर, किशोर महाबोले, अनिकेत केळकर, अभिजीत कुलकर्णी, ओंकार कर्वे, ज्ञानेश्वर वाघ, पूजा राज, प्रवीण दवे, विद्या भाटिया, प्रतिक चांदवडकर, प्रकाश गायकवाड, बजरंग लहाने, विष्णू चौधरी, सिद्धार्थ, रामकृष्ण थोरात, निकिता, संगीता, योगिता यांच्या भूमिका आहेत.
चित्रपटात वेगवेगळ्या जॉंनरची चार गाणी असून ती आदर्श शिंदे, महमद अजीज, रुतु पाठक, उत्तरा केळकर, शाहीद मालिया, सोनू मालिया, कविता निकम यांनी गायली आहेत. गीते बाबासाहेब सौदागर, अभिजीत कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाघ यांनी लिहिली असून संगीत देव-आशिष यांचं आहे. कथा संतोष हुदलीकर यांची असून पटकथा-संवाद डॉ. मुरलीधर भावसार यांचे आहेत. संकलन विनोद चौरसिया तर छायांकन मनिष पटेल यांचं आहे. सहनिर्माते नितीन पाटील आहेत. नृत्यदिग्दर्शन प्रविण बारिया यांचं आहे. वेशभूषा मानिक गायकवाड, तर रंगभूषा रमेश विरकायदे यांची आहे. केशभूषा सायरा यांची असून साहसदृश्ये रसीद मास्टर यांची आहेत. कला दिग्दर्शन अभिषेक यांचं आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्याचा सक्षम प्रयत्न करणारा निर्भया ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.