आदर्शचे धमाल मस्ती गीत

मराठी चित्रपट संगीतात अनेक नवीन प्रयोग होत असून ते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरताहेत. याच पार्श्वभूमीवर ‘ओढ.. The Attraction’ या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या शैलीतील संगीत ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक धमाल युथ साँग गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आले. ‘सोनाली एंटरटेनमेंट हाऊस’ निर्मित, ‘जी. एस. फिल्मस अकादमी प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ओढ’चित्रपटाची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली असून दिग्दर्शन दिनेश ठाकूर यांचे आहे. ‘अंगात नखरा डोळ्यात मस्ती.. चल प्रेमाची खेळूया कुस्ती..’ असे बोल असणाऱ्या कौतुक शिरोडकर लिखित या गीताला संगीतकार प्रवीण कुंवर यांनी सुरेल संगीताची साथ दिली आहे.
धमाल मस्तीच्या अंदाजातले हे गीत गायला मिळाल्याबद्दल आदर्श शिंदे यांनी ‘ओढ’चे संगीतकार, दिग्दर्शक व निर्माता यांचे विशेष आभार मानले. डीजेवर ताल धरायला लावणारं हे गीत प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास आदर्श शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. कॉलेज गँदरिंगच्या जल्लोषपूर्ण वातावरणात हे गीत लवकरच चित्रीत करण्यात येणार आहे.

Subscribe to receive free email updates: