आपल्या प्रत्येकालाच गूढ, रम्य गोष्टींचं आकर्षण असतं आणि त्याविषयी अनामिक भीतीही असते. भयाच्या याच भावनेला ‘चाहूल’ या हॉरर मालिकेतून साद घालण्याचा प्रयत्न निर्माते आरव जिंदल यांनी केला आहे. ‘युफोरिया प्रॉडक्शन्स’च्या ‘कलर्स’ मराठीवरील ‘चाहूल’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ग्रामीण भागासोबत शहरी भागात देखील या मालिकेने प्रेक्षकवर्ग निर्माण केला असून प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया या मालिकेस मिळत आहेत.
हिंदी सिनेसृष्टीतील निर्माते आरव जिंदल यांच्या ‘चाहूल’ या पहिल्याच मराठी मालिकेला अल्पावधीत मिळालेला हा प्रतिसाद नक्कीच कौतुकास्पद आहे. ‘चाहूल’ ही कथा आहे उच्च शिक्षण घेऊन परदेशातून आपल्या मूळ गावी भवानीपूरला परतलेला सर्जेराव आणि त्याची प्रेयसी जेनिफरची.. त्यांच्या प्रेमात आणि लग्नात एक अज्ञात शक्ती अडथळे आणतेय. प्रत्येक क्षण उत्सुकता वाढवणारी ‘चाहूल’ मालिका ‘कलर्स’ मराठीवर सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. प्रसारित करण्यात येते. याविषयी निर्माता-दिग्दर्शकांनी खूप खिळवून ठेवणारी मांडणी केली असून उत्तम टेक्निशियन्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्सवर सर्वाधिक भर दिला आहे.
निसर्गसौंदर्याने सजलेल्या भोर तालुक्यामध्ये ‘चाहूल’चे चित्रीकरण करण्यात येत असून निर्माते आरव जिंदल यात जातीने लक्ष घालत आहेत. ‘चाहूल’च्या निर्मात्यांनी मालिकेच्या चित्रीकरणात कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ‘चाहूल’च्या कथानकाला साजेसे ग्रॅंजर प्रेक्षकांच्याही लक्षात यावे याकरिता विशेष मेहनत घेतली आहे. विनोद माणिकराव दिग्दर्शित ‘चाहूल’ मालिकेत अक्षर कोठारी, शाश्वती पिंपळीकर, लेझन, माधव अभ्यंकर, उमा गोखले, अनिल गवस, राजेंद्र शिसाटकर,विजय मिश्रा, शिल्पा वाडके, विशाल कुलथे, राधा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.