आपल्या दिमाखदार आयोजनामुळे कल्याणच्या नावलौकिकात भर घातलेला ‘किफ’ म्हणजेच‘कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात नुकताच संपन्न झाला. या फेस्टिवलचे यंदा तिसरे वर्ष होते. रविवार २९ जानेवारीला दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा. हा सोहळा‘फक्त मराठी’ वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. ‘फक्त मराठी’ वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. याच पार्श्वभूमीवर या सोहळ्याच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे फुल ऑन पॅकेज आणले आहे.
यंदा ‘कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे व अश्विनी एकबोटे यांना श्रद्धांजली वाहून पुरस्कार सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘हाफ तिकीट’, ‘काली चाट’, ‘अथांग’ या सिनेमांनी ‘कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वाधिक नामांकने पटकावीत बाजी मारली. या सोहळ्यात जयंत सावरकर यांना कार्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘फक्त मराठी’वर प्रक्षेपित होणाऱ्या या सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केले. या सोहळ्यात भार्गवी चिरमुले, सिया पाटील, मनीषा केळकर, स्मिता तांबे, आशिष पाटील, नकुल घाणेकर यांच्या नृत्याला; ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या अभंग व भक्तिगीतांना रसिकांनी मनमुराद दाद दिली. अमृता नातू यांनी आपल्या गायनाने उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रसाद खांडेकर, सुहास परांजपे, प्रभाकर मोरे, आरती सोळंकी, विजय कदम, माधवी जुवेकर, पूजा नायक, श्याम राजपूत यांच्या प्रहसन नाट्यकृतींनी उपस्थितांना दिलखुलास हसविले. या धमाल कार्यक्रमाची लज्जत ‘फक्त मराठी’वर अनुभवता येणार आह
मराठी – हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि मान्यवर आवर्जून या सोहळ्यास उपस्थित होते. ‘कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’चा सोहळा उत्तरोत्तर रंगला असून प्रेक्षकांना याचा आस्वाद ‘फक्त मराठी’वर रविवार २९ जानेवारीला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. घेता येणार आहे.