- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ७ : विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून सर्वसाधारण परिस्थितीतून येऊनअनेक क्षेत्रात सुरेश हावरे यांनी केलेले कार्य आदर्शवत असे आहे. मराठी व्यक्ती उद्योग करु शकत नाही असे नेहमी म्हटले जाते, पण सुरेश हावरे यांनी चांगल्या पद्धतीने उद्योग प्रस्थापित करुन हा गैरसमज खोडून काढला आहे. त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
श्री. सुरेश हावरे यांना नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त झाली, त्यानिमित्त ताज हॉटेल येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ आणि विद्यापीठाचे गौरवपत्र देऊन श्री. सुरेश हावरे यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले की, परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात उद्योजक सुरेश हावरे यांनी केलेले संशोधन निश्चितच उपयुक्त असे आहे. अणुशास्त्रज्ञ म्हणूनही त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे, गिर्यारोहण, गृहनिर्माण, उद्योजक निर्मिती अशा विविध क्षेत्रात श्री. हावरे यांनी भरीव कार्य केले असून त्यांच्यावर देण्यात आलेली शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही ते चांगली पार पाडून या क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान देतील. देशातील प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करुन देण्याचे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न आहे. त्यानुसार अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला २०१९ पर्यंत घर देण्याचे ध्येय असून अडीच लाख घरांची निर्मिती सुरु झाली आहे, असे ते म्हणाले.
यावेळी श्री. हावरे यांच्या ‘उद्योग करावा ऐसा’, ‘डुइंग बिझनेस विदाऊट युअर मनी’ या पुस्तकांसह ‘सुरेश हावरे बिझनेस शो’च्या डीव्हीडीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘दि सुरेश हावरे स्टार्टअप शो’चा शुभारंभ करण्यात आला.