मराठी चित्रपट गीतांना, अल्बमसना व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असणाऱ्या ‘व्हिडिओ पॅलेस’ने नव्या गुणवंतांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आजवर अनेक अल्बमकरिता पुढाकार घेतला आहे. ‘ब्रेक अप के बाद’, ‘तोळा तोळा’, ‘यारिया’, ‘मला लगीन करायच’, ‘पाऊस छत्री आणि ती’ च्या यशानंतर आता झगा हा अल्बम प्रस्तुत केला असून नुकताच या अल्बमचा प्रकाशन सोहळा म्युझिक टीमच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. या अल्बमची निर्मिती रईस लष्करिया प्रोडक्शनने केली आहे. अमितराज यांचा संगीतसाज लाभलेलं हे गीत, गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलं आहे. अल्बमचं दिग्दर्शन विशाल घाग यांनी केलं आहे.
‘फिगर टंच सॅण्डल उंच टकमक टकमक बघा’ असे बोल असलेलं हे गीत प्रेक्षकांना नक्कीच ठेका धरायला लावेल. गायिका माधुरी नारकर यांनी ते आपल्या सुमधुर आवाजात गायलं असून अभिनेत्री मीरा जोशी व माधुरी नारकर यांच्यावर ते चित्रित करण्यात आलं आहे. या अल्बमचे छायाचित्रण लॉरेन्स डिकोना यांनी तर संकलन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. या अल्बमचे नृत्यदिग्दर्शन अमित बाईंग यांचं आहे. हे लग्नसराईतल्या संगीत पार्टीचं गीत असून कुटुंबातल्या सर्वांना या गीताचा आस्वाद घेता येईल, तसेच प्रत्येक संगीत पार्टीत हे गीत नक्की वाजेल असा विश्वास म्युझिक टीमने याप्रसंगी व्यक्त केला.
आपल्या या इनिंगबद्दल बोलताना माधुरी सांगतात की, ‘लहानपणापासून केवळ आवड म्हणून गाणं शिकले, पण नंतर या आवडीचं करिअरमध्ये रुपांतर व्हावं असं मला जाणवू लागलं. यासाठी या क्षेत्रात काम करायला हवं या जाणीवेतून अल्बममध्ये गाण्याची इच्छा निर्माण झाली. प्रत्येकालाच त्याचं नाव आणि काम रसिकांपर्यंत पोहचावं असं वाटतं. ही माझी इच्छा या अल्बममुळे पूर्ण झाली. यासाठी मला ‘व्हिडिओ पॅलेस’ व रईस लष्करिया प्रोडक्शनची चांगलीच साथ मिळाली. प्रेक्षकांनाही हा झगा निश्चितच आवडेल असा विश्वास माधुरी नारकर यांनी व्यक्त केला.