'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' या आगामी सिनेमातील शीर्षकामध्ये, मराठीच्या एका प्रचलित म्हणीचा वापर करण्यात आला आहे. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' अशी हि प्रचलित म्हण असून, याचा अर्थदेखील तितकाच गहिरा आहे. 'आई' चे हेच महत्व पटवून देणारे भिकारी चित्रपटातील 'मागू कसा' हे बोल असलेले गाणे, काळजाचा वेध घेते. मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित 'भिकारी' या बहुचर्चित सिनेमातील ह्या गाण्याचे नुकतेच अंधेरी इथे सॉंग लॉंच करण्यात आले. विशेष म्हणजे, या सिनेमातील सर्व स्टारकास्टच्या आईंनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. गणेश आचार्य दिग्दर्शित 'भिकारी' ह्या सिनेमात आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची नाजूक गुंफण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 'मागू कसा' हे गाणे याच धाग्यातले असून, हे गाणे प्रत्येकांना आपल्या आईची आठवण करून देईल.
संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडीमध्ये गणल्या जाणा-या अजय-अतुलमधील अजय गोगावलेचा या गाण्याला आवाज लाभला आहे. प्रसिद्ध गीतलेखक गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे.