आजवर अनेक टीव्ही मालिका, नाटकं आणि चित्रपटातून आपल्या हरहुन्नरी अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता मिलिंद फाटक एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांपुढे येणार आहे. संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित दशक्रिया या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटात मिलिंदनं किरवंत ब्राह्मणाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या आपले तिसऱ्या आठवड्यातही दणदणीत सुरु असून तमाम मराठी रसिकांनी दशक्रियाला भरभरून प्रतिसाद देत मिलिंद फाटकांच्या नारायणाचे कौतुक करायला सुरुवात केली आहे.
कल्पना कोठारी यांच्या रंगनील क्रिएशन्स या निर्मिती संस्थेनं 'दशक्रिया' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बाबा भांड यांच्या मूळ कादंबरीवर आधारित दशक्रियाचे संजय कृष्णाजी पाटील यांनी चित्रपटासाठी पटकथा - संवाद - गीत लेखक आणि प्रस्तुतकर्ते आहेत. तर, महेश अणे यांनी छायालेखन केलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत मिलिंदनं किरवंत ब्राह्मणाची भूमिका कधीच साकारलेली नाही. मृत्यूनंतर क्रियाकर्म करणारे ब्राह्मण आणि त्यांच्यातलं राजकारण असं चित्रण या चित्रपटात आहे.
दशक्रिया या चित्रपटातील भूमिकेविषयी मिलिंद म्हणाला, 'किरवंताची भूमिका मी कधीच केलेली नव्हती. मात्र, या ब्राह्मणांचं समाजातलं स्थान काय आहे याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे भूमिकेसाठी अभ्यास असा नाही करावा लागला. माझ्या स्वभावाच्या अगदी उलट अशी ही भूमिका आहे. लाळगोट्या, दुटप्पी अशी ही भूमिका आहे. मात्र, ही भूमिका साकारण्याचा अनुभव उत्तमच होता.' चित्रपटासाठी केलेला कोल्हापूर - गारगोटी प्रवास, लोकेशन्स, राम कोंडीलकर यांची इतकं मोठ्ठ युनिट सांभाळताना, कलाकार तंत्रज्ञ यांच्या निवासापासून ते झुंडीने येणाऱ्या गर्दीला आवरताना होणारी कसरत, हे सगळं रोमांचक होत.
'दशक्रिया चित्रपटात काम करण्याचा अनुभव फारच कमाल होता. निर्मात्या कल्पना विलास कोठारी यांनी निर्मितीमध्ये कोणतीही कसर ठेवली नाही. दिग्दर्शक संदीप पाटीलचा पहिला चित्रपट असूनही त्याच्यात अजिबात नवखेपणा नव्हता. प्रत्येक बाबतीत त्याची तयारी पक्की झालेली होती. तसंच बाबा भांड यांच्या कादंबरीचा खूप अभ्यास करून संजय कृष्णाजी पाटील यांनी पटकथा लिहिली. महेश अणे यांच्यासारखे अनुभवी सिनेमॅटोग्राफर, मनोज जोशी, दिलीप प्रभावळकर, आदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, नंदकिशोर चौघुले, अशा शेलार, संतोष मयेकर या कसलेल्या अभिनेत्यांसोबतच बालकलाकार आर्या आढाव, विनायक घाडीगांवकर अशा उत्तम कलाकारांबरोबर काम करायला मिळणं ही पर्वणीच होती,' असंही त्यानं आवर्जून सांगितलं.