कीर्तन हे लोकजागृती, समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा,विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने निरुपण करत समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न केला. रंजनातून अंजनाचा हा वसा आता झी टॅाकीज या चित्रपट वाहिनीच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे.
‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत दिवसाची सुरुवात आध्यात्मिक व मंगलमय करण्याचा आगळा प्रयत्न झी टॅाकीज करणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम सादर करणारी झी टॅाकीज ही पहिलीच चित्रपट वाहिनी आहे. सोमवार २० फेब्रुवारीपासून दररोज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत या कार्यक्रमाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमातून विविध विषयांवर अनेक कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून निरुपण करणार आहेत. काहीतरी वेगळेपणा देण्याच्या दृष्टीनं निवेदकाच्या माध्यमातून कीर्तनाचा हा वेगळा प्रयोग रंगणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील मंदिरांमध्ये हे कीर्तन रंगणार आहे.
दीप्ती भागवत व ऋतुजा बागवे याचं मधुर निवेदन तसंच श्यामसुंदर सोन्नर, पांडुरंग शितोळे, सुप्रियाताई साठे, अमृत जोशी, योगीराज गोसावी, वावीकर महाराज या नामवंत कीर्तनकारांचे ओघवत्या शैलीतील कीर्तन प्रेक्षकांना आध्यात्मिक अनुभूती देईल. मनोरंजनाची अद्ययावत साधनं उपलब्ध असताना नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा झी टॅाकीजचा हा उपक्रम स्तुत्यच आहे. प्रेक्षकांना कीर्तनाच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच मनःशांती लाभू शकेल या विश्वासातूनच झी टॅाकीजने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.