झी टॅाकीजवर ‘गजर विठू माऊलीचा’

झी टॅाकीज वाहिनीने आजवर अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या झी टॅाकीजने ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या आध्यात्मिक कार्यक्रमाची निर्मिती करत एक वेगळा प्रयोग केला. झी टॅाकीजच्या या आगळ्या प्रयोगाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला, येत्या आषाढी एकादशी च्या निमित्ताने झी टॅाकीजवर ‘विठू माऊलीचा’ गजर दुमदुमणार आहे. आषाढी एकादशी म्हटल की, डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी, भक्तीचा उत्सव!.. हाच उत्सव मनोरंजनाच्या माध्यमातून झी टॅाकीजवर रविवार २५ जूनला दुपारी १२.०० वाजता साकारणार आहे.
भक्ती व मनोरंजनाचा अनोखा मिलाफ साधत रंगलेल्या गजर विठू माऊलीचा या कार्यक्रमाचे खुशखुशीत निवेदन मकरंद अनासपुरे व आनंद इंगळे यांनी केलं आहे. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला’ या गीतावर  नकुल घाणेकर व सहकाऱ्यांनी सादर केलेले नेत्रसुखद पालखी नृत्य चांगलचं रंगलं. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’, ‘आम्हा न कळे ज्ञान’, ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ या संतवाणीतील रचनांचे स्वरपुष्प गुंफत दीप्ती भागवत, प्रथमेश लघाटे, ज्ञानेश्वर मेश्राम यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अभिनेत्री दिपाली सय्यद, मृण्मयी देशपांडे, अभिनेता अभिजीत केळकर, आदिनाथ कोठारे, यांनी ‘तुझ्या कीर्तनात न्हालो आणि माणसात आलो’, ‘जय जय राम कृष्ण हरि’ ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘आजि सोनियाचा दिनू’ ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, ‘तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना’ या भक्तीगीतांवर बहारदार नृत्य करत नृत्यसंगीत संध्येची मैफिल सजवली. सुप्रिया पाठारे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, प्रियदर्शन जाधव यांनी सादर केलेल्या स्कीट्सने ही चांगलीच रंगत आणली. या मनोरंजनाच्या मेजवानी सोबत प्रसिद्ध निरुपणकर ह.भ.प बाबा महाराज सातारकर यांच्या भक्तीमय निरुपणाने हा सोहळा अधिकच मंगलमय झाला. याप्रसंगी बाबामहाराज सातारकर यांचा सन्मानही करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे “विठ्ठल विठ्ठल गजरीअवघी दुमदुमली पंढरी याचा प्रत्यय रसिकांना नक्कीच येणार आहे.

Subscribe to receive free email updates: