पती-पत्नीचं नातं हे एक अजब रसायन आहे. कडू, गोड, तिखट आणि आंबट अशा नात्यातील विविध चवींचा आस्वाद या रसायनातून चाखायला मिळत असते. सहजीवनाच्या या वाटचालीत-दोघांच्याही दृष्टीनं- बरेवाईट प्रसंगातून सुखद प्रवास करत आयुष्याच्या उतारवयात या रसायनात अधिक परिपक्वता येते. पतीपत्नीच्या याच नात्यावर 'के दिल अभी भरा नही' हे नाटक भाष्य करते. उतार वयातील जोडप्याची कथा मांडणारे हे नाटक लवकरच ७५ व्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. गोपाल अलगिरी यांच्या वेद प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाची पंच्याहत्तरी रविवार २२ जानेवारी रोजी दु४ वाजता विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात पार पाडली जाणार आहे.
मंगेश कदम यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक खऱ्या आयुष्यातील घटनांचा वेध घेत असल्यामुळे, नाट्यरसिकांना ते आपलेसे करण्यात यशस्वी होत आहे. खास करून. 'गोष्ट तशी गमतीची' या गाजलेल्या नाटकाचे गमतीदार दांपत्य मंगेश कदम आणि लीना भागवत यांची रियल केमिस्ट्री या नाटकामधून दिसून येते. तसेच चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांच्याही यात भूमिका आहेत. एकेकाळी विक्रम गोखले आणि रीमा लागू यांनी गाजवलेल्या या नाटकाला नव्याने उभे करत, आजच्या नव्या दमाच्या कलाकारांनी 'के दिल अभी भरा नही' नाटकाला चांगलाच न्याय दिला आहे.
निवृतीनंतरचे तणावरहित आयुष्य जगू पाहणाऱ्या प्रत्येकाला हे नाटक आपलेसं करतंच. माणसे नोकरी लागली की आर्थिक व्यवस्थापनाचा विचार करायला सुरुवात करतात. मात्र हे सगळ करत असताना भावनिक व्यवस्थापनाचा विचार करायचा ते विसरून जातात. या नाटकात अरुण आणि वंदना या जोडप्याच्या माध्यमातून उतार वयातील स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेल्या भाविनक गरजांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मनाला भावणारी आणि थोड्याबहुत फरकाने प्रत्येक घराघरातील गोष्ट मांडणारा हा 'उतरायण' मनाला सहज भावेल, असे हे नाटक आहे.