सिनेमाच्या नावामुळे चर्चेचा विषय ठरलेला, पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या सिनेमातील 'दारू डिंग डांग' या गाण्याचे नुकतेच गोरेगाव येथील एंजल स्टुडियोत चित्रीकरण करण्यात आले. 'ड्राय डे झाला वेट वेट, गोळा सारा झाला गाव' असे या गाण्याचे बोल असून, ऋत्विक केंद्रे, योगेश सोहनी, चिन्मय कांबळी, कैलाश वाघमारे या चार मित्रांवर नव्याने चित्रित करण्यात आलेले हे गाणे, आजच्या तरुणाईला आपल्या तालावर झिंगवण्यास पुरेसे ठरणार आहे. लवकरच हे गाणे सर्वत्र प्रदर्शित होत असून, पूर्वचित्रित केलेले गाणे देखील लोकांना पाहता येणार आहे.
संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमातील जय अत्रे लिखित 'दारू डिंग डांग' हे गाणे विशाल दादलानी यांनी गायले असून, त्यांच्या आवाजातील नशा या गाण्यात उतरलेली पाहायला मिळते. विशेष म्हणजे, प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या हस्ते सादर करण्यात आलेल्या या सिनेमाच्या संगीत सोहळ्यात 'दारू डिंग डांग'चे पूर्वचित्रित केलेले गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. ते गाणे देखील लोकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. मात्र, या गाण्याला नव्याने साज चढवताना तब्बल २५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. पुनःचित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचा भव्य सेटच मुळात १० लाखात उभारण्यात आला असल्यामुळे, नव्याने सादर होत असलेल्या या गाण्याच्या दर्जेदार व्हर्जनचा रसिक पुरेपूर आनंद लुटतील अशी 'ड्राय डे' सिनेमाच्या संपूर्ण टीमला अपेक्षा आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतल्या या आगळ्यावेगळ्या 'ड्राय डे' चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, याचे पटकथा व संवाद नितीन दीक्षित यांनी लिहिले आहेत. तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमात पार्थ घाटगे, मोनालिसा बागल, आयली घिए, जयराम नायर आणि अरुण नलावडे हे कलाकारदेखील आपल्याला पहायला मिळणार आहेत.