'ओंकार स्वरूपा सद्भगुरू समर्था अनाथांच्या नाथा तुज नमो', ‘अशी सांज झाली’,'विठ्ठलपुरीचा निळा', ‘जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, ‘हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाल म्हणा’, ‘शतजन्म शोधताना’, ‘सुर बने श्याम’, ‘सांज ढले गगनतले’,'ए जिंदगी गले लगाले', दिव्य स्वातंत्र्य रवी, मास्टर दीनानाथांची रसूलला ही बंदीश एकत्र सादर करून रसिकांना दैदिप्यमान स्वरानुभूती झाली. त्याच बरोबर श्रीनिवास खळे यांच्या काही दुर्मिळ रचना सादर करून रसिकांची मने झिंकली. अश्या अनेक अवीट गोडीच्या अनवट गीतांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकश्रोत्यांना समृद्ध करणारा अनुभव देत ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर आणि आघाडीचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी रसिकप्रिय पुणेकरांना तृप्त केले. तुडुंब भरलेल्या ‘बालगंधर्व कलामंदिरात’ दर्दी, जाणकार संगीतप्रेमींना ‘स्वरयज्ञ’द्वारे ही अलौकिक संगीतानुभूती ‘याची डोळा, याची देही’ काल अनुभवता आली.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त खास जेष्ठ गायक पं. सुरेश वाडकर आणि डॉ. भरत बलवल्ली यांच्या मधुरसंगीत सुरांनी समृद्ध करणारया 'स्वरयज्ञ'या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यातील‘बालगंधर्व कलारंगमंदिरात’ रसिकांना हा योग त्यांच्या मनात कायमस्वरूपी साठवण्याची संधी मिळाली. यावेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व केंद्रीय राज्य मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. सत्यपाल सिंग, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे, प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अनिल शिरोळे, मा, खासदार संगीतदर्दी उल्हासदादा पवार, अभिनेते,दिग्दर्शक अमोल पालेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. या मैफलीत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी परमवीर चक्र विजेत्या सैनिकांच्या प्रतिमा पुण्यातील महाविद्यालयांना ‘वीर सेनानी फाऊंडेशन’ यांच्या सहाय्याने देण्यात आल्या.
या मैफलीत ‘हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाल म्हणा’, ‘सुर बने श्याम’, ‘सांज ढले गगनतले’, 'ए जिंदगी गले लगाले', 'बाबुल मोरा', ‘शतजन्म शोधताना’, या गाण्यांना रसिकांनी भरभरून वन्स मोअर दिले. त्याचबरोबर विविध रागांमध्ये गुंफलेली रागमालासुद्धा रसिकांना विशेष भावल्या. पं. सुरेश वाडकर आणि स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी प्रथमच एकत्रित संगीत मैफल सादर केली. या मैफलीत भक्ती संगीतापासून नाट्यसंगीत ते गझल गायनापर्यंत आणि शास्त्रीय रचनांपासून थेट चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व रसिकप्रिय संगीतरचनांचे सादरीकरण करण्यात आले. संगीत संयोजन कमलेश भडकमकर, कार्यक्रमाचे खुमासदार प्रफुल्लीत निवेदन करणाऱ्या मंगला खाडिलकर त्याच प्रमाणे श्रुती भावे, सागर साठे, माधव पवार, मकरंद कुंडले,विनायक नेटके आणि बासरीवादक वरद कठापूरकर यांच्या सुरेल साथीने कार्यक्रमाला अधिकच रंगत आणली.