‘तमाशासम्राज्ञी’ म्हटले की डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे.. विठाबाई नारायणगांवकर.
विठाबाईंचा तमाशासृष्टीतील प्रवास हा अत्यंत खडतर आणि संघर्षमय होता. मात्र त्यांनी प्रत्येक संघर्षाला मोठ्या हिमतीने तोंड देऊन तमाशा या लोककलेवर निस्सीम प्रेम केले. विठाबाईंचा खडतर जीवन प्रवास हा प्रत्येक कलावंताला एक आदर्श आहे, अशा विठाबाईंची भूमिका साकारायला मिळणे, माझ्यासाठी खरोखरच एक मोठे आव्हान होते, अशी भावना ‘विठा’ या आगामी मराठी चित्रपटात विठाबाईंची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे यांनी नारायणगाव येथे व्यक्त केली. विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर यांच्या १५ व्या स्मृतीदिनी आयोजित अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी ‘विठा’ चित्रपटाचे दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ यांनी, महाराष्ट्राला माहीत असलेल्या ‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई देशासोबत संपूर्ण जगाला कळाव्यात या उद्देश्याने या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे दिग्दर्शन केल्याचे सांगितले.
‘विठा’ चित्रपटाची निर्मिती ‘नम्रता एन्टरटेण्मेंट प्रा. लि.’ आणि ‘आपला पिक्चर’ या चित्रपट निर्मिती संस्थेनी मिळून केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते दिनेश अग्रवाल, सौ. प्रितम दिनेश अग्रवाल, शुभदा भोसले आणि स्वतः पुंडलिक धुमाळ आहेत. अभिनेत्री उर्मिला यांच्यासोबत अभिनेते उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा विठाबाई नारायणगांवकर यांचे नातू मोहित नारायणगांवकर आणि विठाबाईंची मुले विजय, कैलास, राजेश नारायणगांवकर या कुटुंबीयांशी चर्चा करून ठरविण्यात आली आहे. चित्रपटाचे पटकथा – संवाद पुंडलिक धुमाळ आणि शंतनू रोडे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण सिनेमॅटोग्राफर संजय जाधव आणि देवेंद्र गोलतकर यांनी केले असून कलादिग्दर्शन महेश साळगांवकर यांचे आहे. अजित परब, समीर म्हात्रे आणि रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. फुलवा खामकर यांचे नृत्यदिग्दर्शन, अनिल पेमगिरीकर, डि. एन. इरकर व महेश बराटे यांनी रंगभूषा तर संजीव राजसिंह यांनी वेशभूषा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाचे संकलन विजय खोचीकर करीत आहेत. चित्रपटाचे साउंड डिझाइनिंग दिनेश उच्चील यांनी केले असून कार्यकारी निर्माते चंद्रशेखर ननावरे आहेत.
नारायणगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विठाबाईंच्या १५ व्या स्मृतिदिनी ‘विठा’चे निर्माते दिनेश अग्रवाल, शुभदा भोसले, दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ, अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे, अश्विनी शेंडगे, विठाबाई यांचे मुलगे विजय, कैलास, राजेश नारायणगांवकर; विठाबाईंच्या मुली मंगला बनसोडे, संध्या माने व विद्या आणि नातू मोहित नारायणगांवकर या परिवारासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी निर्माते दिनेश अग्रवाल यांनी रुग्णसेवा करण्याच्या हेतूने नारायणगावमध्ये विठाबाईंच्या स्मृतीप्रित्यर्थ अत्याधुनिक रुग्णवाहिका देणार असल्याचे जाहीर केले. ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची? या विठाबाईंच्या लोकप्रिय लावणी गीतावर त्यांची मुलगी आणि प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी स्वतः गाऊन नृत्य सादर केले.
येत्या एप्रिल-मे महिन्यात विठाबाईंच्या आयुष्यावर बेतलेला ‘विठा’ हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.