'मनमौजी जगायचे, स्वच्छंदी उडायचे...' हे फुगे सिनेमाचे रिफ्रेश करणारे गाणे आजच्या तरुणाईना भुरळ पडणारे आहे. फुग्यांप्रमाणे रंगबेरंगी आणि स्वच्छंदी उडण्याचे स्वप्न कोणाला पडत नसेल? अशा या फुग्यांचे खास आकर्षण असणा-या युवकांना एकत्र आणणाऱ्या हटके कॅम्पेनची कीर्ती कॉलेजमध्ये सुरुवात झाली. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असणा-या 'फुगे' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनासाठी राबवलेल्या या हटके कॅम्पेनमधून संपूर्ण महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक फुग्यांचे वाटप केले जाणार आहे.
प्रभादेवी येथील कीर्ती कॉलेजमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात 'फुगे' सिनेमाच्या म्युजिक टीममधील जान्हवी प्रभू अरोरा आणि निलेश मोहरीर यांनी उपस्थिती लावली होती. एक सूर तर एक ताल असणा-या या दोघांनी कॉलेज विद्यार्थांसोबत धम्माल मस्ती करत, फुग्यांचे वाटप केले. आपल्या सर्वांचे आयुष्य फुग्यांप्रमाणे स्वच्छंदी आणि रंगतदार व्हावे अशी शुभेच्छा या दोघांनी विद्यार्थ्यांना दिला. एवढेच नाही तर जान्हवीने आपल्या मधुर आवाजात फुगे सिनेमातील 'काही कळे तुला' हे रॉमेंटीक गाणे गाऊन कार्यक्रम रंगात आणला. तसेच सिनेमाच्या गाण्यावर ठेका धरत आणि फुगे आकाशात उडवत सिनेमाच्या कॅम्पेनची शानदार सुरुवात देखील केली.
मैत्रीच्या विश्वात रमणाऱ्या आणि बॅचलर लाइफ जगू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी 'फुगे' हा सिनेमा लवकरच मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन येत आहे. इंदरराज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार, अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी ह्यांची निर्मित असलेला हा सिनेमा स्वप्ना वाघमारे यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या १० फेब्रुवारी रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.