शेलार मामा फाऊंडेशन’च्या वतीने व ‘जय भारत सेवा संघ’ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘शेलार मामा चषक’ महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, कबड्डीपटू बाजीराव होडगे आणि अभिनेते सुशांत शेलार उपस्थित होते. स्पर्धेला गुरुवारी सुरुवात झाली असून १६ संघ यात सहभागी झाले आहेत.
अंकुश चौधरी यांनी उपस्थित सर्व संघांना शुभेच्छा देत चांगल्या उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद व्यक्त केला. व कबड्डीपटू बाजीराव होडगे यांनी सर्व संघाना मार्गदर्शन केले. महिला कबड्डी संघांचा या स्पर्धेतील सहभाग हे प्रमुख आकर्षण मानले जात आहे. श्रमिक जिमखान्यावर रंगणाऱ्या या सामन्यांसाठी सल्लागार दीपक वेतकर, करण नाईक, आमदार सुनील शिंदे, सुनील राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
सुशांत शेलारचे वडील अरुण दत्तात्रय शेलार हे उत्तम कबड्डीपटू होते. त्यांच्या स्मरणार्थ सुशांत शेलार यांनी या सामन्यांचे आयोजन केले आहे. १७ डिसेंबरला अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिस ही ठेवण्यात आली आहेत.