समाजसेवक विशाल परुळेकरांच्या कार्याचा गौरव शिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा

आपल्या संस्कृतीत मातृऋणपितृऋणगुरूऋण याव्यतिरिक्त ही एक देणे असते ते ... म्हणजे समाजाचे.  हेच सामाजिक भान जपत अभिनेता अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधत स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या सेटवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. जगदंब क्रिएशनची निर्मिती असलेली स्वराज्य रक्षक संभाजी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना,  त्यावर मार्ग शोधत असताना,  अनपेक्षितपणे एखाद्या चांगल्या समाजपयोगी कामाची सुरुवात होते! श्री विशाल परुळेकर आणि त्यांच्या साई आधार’ या संस्थेचे कार्य ही याच पठडीतले असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचललेली आहे. श्री.विशाल परुळेकर यांच्या या कार्याला पाठिंबा देत त्यांचा गौरव करण्यासाठी ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर नुकतेच त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी विशाल परुळेकर व ते सांभाळ करीत असलेले विद्यार्थी सेटवर उपस्थित होते. या सगळ्यांबरोबर  स्नेहभोजनाचा आस्वाद घेत संभाजी मालिकेतील कलाकारांनी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. या मालिकेतील येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड तसेच धाराऊ म्हणजे लतिका सावंत आणि पुतळाबाई म्हणजे पल्लवी वैद्य यांनी उपस्थित विद्यार्थी व विशाल परुळेकर यांचे औक्षण केले. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवराय, जिजाऊ व संभाजी महाराज यांचे स्मरण करत पोवाडा व गाणी यावेळी या मुलांनी सादर केली.
विशाल परुळेकर यांचे कार्य खूप मोलाचे असून ते सर्वांपुढे आणत त्यांच्या कार्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी  आम्ही हा पुढाकार घेतल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. या संस्थेला डॉ. अमोल कोल्हे यांनी वैयक्तिक स्वरुपाची आर्थिक मदत सुद्धा केली आहे.

Subscribe to receive free email updates: