मराठमोळ्या मातीतला कबड्डी हा रांगडा खेळ. लहानपणापासून आपल्यापैकी प्रत्येकाने हा खेळ खेळला आहे. प्रो कबड्डीमुळे त्याला ग्लॅमर मिळालं असलं तरी स्थानिक पातळीवरील खेळाडूंना योग्य व्यासपीठ आजही उपलब्ध नाही. हे लक्षात घेत अभिनेता सुशांत शेलार यांनी कबड्डीला प्रोत्साहन मिळावे तसेच स्थानिक खेळाडूंना योग्य ती संधी देण्यासाठी ‘शेलार मामा फाऊंडेशन’च्या वतीने गेल्या वर्षीपासून ‘शेलारमामा चषक’ सामन्यांचे आयोजन केले. यंदाही हे सामने गुरुवार १४ डिसेंबर ते रविवार १७ डिसेंबर दरम्यान श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ येथे रंगणार आहेत. यंदाच्या सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महिला गट या सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे. ‘ब’ वर्ग पुरुष गटाला व महिला गटाला ‘योग्य व्यासपीठ मिळावं व त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा याकरिता त्यांच्यासाठी या सामन्यांचे खास आयोजन केले आहे.
गिरणगावात वाढलेल्या सुशांत शेलारची ‘कबड्डी’ खेळाशी लहानपणापासून नाळ जोडली गेली आहे. ‘कबड्डी’साठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तरच कबड्डीचा दम सर्वत्र घुमेल या उद्देशाने हे सामने आयोजित केल्याचं सुशांत सांगतो. सुशांत शेलारचे वडील अरुण दत्तात्रय शेलार हे उत्तम कबड्डीपटू होते. त्यांच्या स्मरणार्थ सुशांत शेलार यांनी या सामन्यांचे आयोजन केले आहे. अस्सल मातीतल्या कबड्डीची चुरस व त्यातील थरार सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा यासाठी अभिनेता सुशांत शेलार यांनी घेतलेला पुढाकार खेळाडूंचे मनोबल वाढवणारे आहे.
‘जय भारत सेवा संघ’ यांच्या सहकार्याने व ‘मुंबई शहर कबड्डी अशोसिएशन’च्या मान्यतेने रंगणाऱ्या या सामन्यांसाठी चित्रपटसृष्टीतील व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सल्लागार दीपक वेतकर, करण नाईक, आमदार सुनील शिंदे, सुनील राऊत यांचे विशेष सहकार्य या सामन्यांसाठी लाभले आहे.