महराष्ट्राचा सुपरस्टार आणि लाखो मराठी युवकांचा स्टाईल आयकॉन असलेल्या अंकुश चौधरीच्या अतरंगी 'देवा'ने संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावले आहे. सुखी आयुष्याचा कानमंत्र देणा-या या सिनेमाला राज्यभर पसंती मिळत असून, प्रत्येक सिनेमागृहातील तिकीट खिडकीवर हाऊसफुल्लची पाटी झळकताना दिसत आहे. नाताळ सणाच्या सुट्टीत रसिकांच्या भेटीस आलेल्या या चित्रपटाने केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनादेखील आपलेसे केले आहे.
मुरली नलप्पा यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा, हिंदीची प्रतिष्टीत निर्मितीसंस्था असलेल्या प्रमोद फिल्मने इनोव्हेटिव्ह फिल्मसोबत निर्मित केला असून, प्रदीप चक्रवर्ती आणि प्रतिक चक्रवर्ती त्याचे निर्माते आहेत. मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांसमोर आयुष्याचे गमक मांडणारा हा सिनेमा, प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाविषयी विचार करण्यास उद्युक्त करतो. एका बाजूला खळखळून हसायला लावतानाच हा 'देवा' दुसरीकडे रसिकांना भावविवशदेखील करतो. विशेष म्हणजे, या सिनेमाची मौखिक प्रसिद्धीच अधिक होताना दिसून येत आहे. या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांना आवडत असून, 'देवा' ची प्रत्येक स्टाईलचे अनुकरण प्रेक्षक करू लागली आहेत. हा सिनेमा पाहून आल्यानंतर त्यांच्या चेह-यावर एक वेगळीच प्रसन्नता पाहायला मिळत असून, हा सिनेमा आशावादाची वाट रसिकांना दाखवत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
तेजस्विनी पंडीत आणि स्पृहा जोशी या मराठीतील आघाडीच्या नायिकांना एकत्र आणणा-या या सिनेमाचा आशय आणि मांडणी सिनेरासिकांपर्यंत अचूक पोहोचले असल्याचे हे चिन्ह असून, सर्व सुखाय आणि हिताय असलेला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अतरंगी 'देवा' ची बहुरंगी लीला दाखवण्यास यशस्वी होत आहे.