मुंबई, १४ मार्च २०१८ : कलर्स मराठी वरील “घाडगे & सून” मालिकेमध्ये प्रत्येकच सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रथा आहे. मग दिवाळी असो वा होळी – रंगपंचमी असो. आता घाडगे सदन मध्ये तयारी सुरु झाली आहे ती गुढीपाडवाची... अक्षय आणि अमृताचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा असल्याने घाडगे परिवार हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार यात शंका नाही. गुढी म्हणजे आनंदाच प्रतिक. या दिवशी शुभकार्याचा प्रारंभ करण्याची प्रथा आहे. आपल्या कुटुंबांचे सर्व संकटापासून संरक्षण करण्यासाठी गुढी भारली जाते. अक्षय आणि अमृता यावर्षी गुढी उभारणार असून माई स्वत: श्रीखंड, पुरणाची पोळी करणार आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या लाडक्या अक्षय आणि अमृताने या दिवसाच्या काही आठवणी सांगितल्या...
“घाडगे आणि सून” मालिकेमध्ये एकीकडे माई अक्षय – अमृता नव्या नात्याच्या शुभारंभाची गुढी उभारत आहेत तर दुसरीकडे वसुधा हाती आलेल्याघटस्फोटाच्या कागदपत्रांनी हे नातं तोडेल का हि भीती अमृताच्या मनात आहे. घाडगे सदन मध्ये गुढीपाडवा आनंदाने आणि जल्लोषात साजरा होणार असून वसुधाच्या हाती अक्षय आणि अमृताचे घटस्फोटाचे लागलेले कागदपत्र वसुधा माईना तर दाखवणार नाही ना ? अक्षय आणि अमृताच्या नव्या नात्याचा शुभारंभ होणार का ? हे जाणून घेण्यासाठी बघा घाडगे & सूनचा गुढीपाडवा विशेष कलर्स मराठीवर.
- अमृता घाडगे (भाग्यश्री लिमये) : गुढीपाडवा माझ्यासाठी नेहेमीच संस्मरणीय आहे...
हिंदू वर्षारंभ म्हणजे चैत्रशुध्द प्रतिपदा... गुढीपाडवा या सणाने होतो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस असल्याने चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी करतात. म्हणूनच माझ्या आईने मी लहान असताना मला पाटी आणि पेन्सिल भेट म्हणून दिली. पाटी स्वच्छ धुतली त्यावर सरस्वतीच चित्र काढून आईनं मला पाटीची पूजा करायला सांगितले आणि तिथूनच माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु झाला. दरवर्षी आम्ही भावंड यादिवशी पाटीची पूजा करतो.
निसर्गाशी नातं जोडणारा, वर्षाच्या सुरुवातीलाच मागच्या सगळ्या कडू गोष्टी विसरून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरु करा असं सांगणारा गुढीपाडवा माझ्यासाठी नेहेमीच संस्मरणीय आहे...
- अक्षय घाडगे (चिन्मय उद्गीरकर) : गुढीपाडवा म्हणजे नात्यांची नव्याने सुरुवात !
गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा प्रारंभ.... वर्षाची नव्याने सुरुवात... आपले सण साजरे करून आपण आपली संस्कृती जपायला हवी असं मला वाटतं. आपण सण साजरे करायला हवे कारण, आत्ताच्या काळात त्याची आवश्यकता आहे. नाती संबंध वरवरचे झाले आहेत मोबाईल, ईमेल, यामुळे आपण नातेवाईंकांना खूप कमी भेटतो. पण, या सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात त्यामुळे एकत्र येण्याची कुठलीही संधी आपण सोडता कामा नये असं मला वाटतं. नात्यांच्या नव्या सुरुवातीसाठी मला हा सण महत्वाचा वाटतो...