चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची १४८ वी जयंती नुकतीच दादरच्या दादासाहेब फाळके चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी तसेच चित्रपटसृष्टीचे अनेक मान्यवर याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.
दादासाहेब फाळके यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या ज्योती निसळ लिखित ‘ध्येयस्थ श्वास’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्ताने प्रकाशित झालेले हे पुस्तक त्यांना अनोखी मानवंदना ठरेल असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी यावेळी केले.
ज्येष्ठ अभिनेते राजदत्त, विजू खोटे, अभिनेता अंकुश चौधरीआदेश बांदेकर, अभिनेत्री वर्षा उसगांवकरनिर्माता दिग्दर्शक सतीश रणदिवे, पितांबर काळे, विनय नेवाळकर, विजय खोचीकर, शरद चव्हाण, संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Subscribe to receive free email updates: