कुंकू, टिकली आणि टॅटू ही चिन्हं स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहेत... मात्र आज स्त्री - पुरुष ही भेदरेषा पुसट झालीय. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सगळ्याच क्षेत्रात भरारी घेतायत. मग या चिन्हांमधूनच व्यक्त व्हायची आज खरंच गरज आहे का? आजच्या काळात या प्रतिकांचा नेमका अर्थ काय? ही प्रतिकं काय सांगू पाहतायत? कलर्स मराठी वाहिनीवर "कुंकू, टिकली आणि टॅटू" नावाची मालिका सुरु झालीय, त्यानिमित्ताने समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांचं कुंकू, टिकली, टॅटू या प्रतिकांबाबत काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न....
1.सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ समाजसेविका
दिसणं महत्वाचं नाही, असणं महत्वाचं आहे... आपली परंपरा छान कपड्यांत झाकली आहे. तिचं उघड्यावर प्रदर्शन मांडू नका... आई मेली कि बाप मरतो पणबाप मेला म्हणून आई मरत नाही. आई आपला संसार, आपली मुलं उघड्यावर नाही येऊ देत. बाईचा जन्म मरण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. तिच्या वाटेतकाटेंच जास्त पण तरी ती डगमगत नाही. मी स्वतः भीक मागून जगले, सरणावर भाकरी भाजून खाल्ली पण मुळीच मागे हटले नाही. स्त्री ही माऊली आहे…सगळ्या जगाला माफ करण्याची ताकद तिच्यात आहे.
सुरेश भटांची एक कविता आहे ....
जन्मलो तेव्हांच नेत्री आसवे घेऊन आलो
दे तुझी आकाशगंगा, बोल मी केव्हां म्हणालो
घेतला मी श्वास जेंव्हा, कंठ होता तापलेला
पोळलेला प्राण माझा, बोलण्याआधीच गेला
जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेंव्हा स्मशानी
घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी!
भटांच्या या ओळी आमच्यासारख्या स्त्रियांसाठीच आहेत, असं मला वाटतं. पण माझा बाईला एक सल्ला आहे कि, तिने आपले खांदे खूप बळकट करावेत...आणि दुःखाला भिडावं ... म्हणजे जग तुला सलाम करेल. कारण तू आई, माई, ताई आहेस, स्त्री आहेस. तू कुंकू लाव, टिकली किंवा टॅटू काहीही लाव पण तूअबला नाहीस, सबला आहेस हे पक्के ध्यानात ठेव!!!
2. अलका आठल्ये , अभिनेत्री
ईशानी आठल्ये , वैमानिक
अलका: स्त्रीकडे बघण्याचा स्त्रीचाच दृष्टिकोन अजून बदललेला नाही. मी माझ्या मुलींना खूप स्वातंत्र्य दिलं. माझ्यावर जे संस्कार झाले त्यामुळे मी कपाळावरकुंकू किंवा टिकली लावून साडी परिधान करून लोकांसमोर जाते. कारण पडद्यावर आणि लोकांमध्ये माझी तशी इमेज आहे. पण खऱ्या आयुष्यात मी खूपवेगळी आहे.. बिनधास्त आहे. पण मला यात सांधा जुळवावासा वाटतो... हा बॅलन्स सांभाळायला मला माझ्या सासूबाईंची खूप मोलाची मदत झाली. स्त्रीलाकुंकवाशिवाय शोभा नाही. कुंकू हा एक संस्कार आहे ... कुंकू म्हणजे सात्विकता... मी घरातून बाहेर पडताना कधीही कुंकू लावल्याशिवाय बाहेर पडत नाही,कारण मला तो देवीचा आशीर्वाद वाटतो.
ईशानी: माझी आई अभिनेत्री अलका आठल्ये व बाबा छायाचित्रकार समीर आठल्ये यांनी सुदैवाने आम्हा दोन्ही मुलींना कधी मुलींसारखं वागा, असे सल्ले नाहीदिले. आमच्यावर संस्कार असे झाले कि जुन्याचा आदर ठेवा नि उंच भरारी घ्या. म्हणूनच मी पायलट होऊ शकले. पण आज हे क्षेत्र निवडल्यावर अनेकजणप्रश्न विचारतात कि, तू घर कसं सांभाळणार? स्वयंपाक येतो का? मला कळत नाही हे प्रश्न मुलींनाच का विचारले जातात? आणि विचारणाऱ्याही बायकाचअसतात, याचंही मला नवल वाटतं. मुलींना का बंधनं? तिच्या घरी येण्याच्या वेळा, पोशाख यांवर सतत निर्बंध घातले जातात. तिला जे सोयीचं वाटतं, तिला जेआवडतं ते तिला परिधान करू द्या... तिला आवडलेलं क्षेत्र निवडण्यासाठी तिला पाठबळ द्या ना…. मला हवं तसंच मी जगेन, मला काम असेल तेव्हा मीघरातून बाहेर पडेन किंवा घरी येईन ... मला जे आवडेल ते मी परिधान करेन. शेवटी मी काय काम करते, ते मला सर्वात महत्वाचं वाटतं .
3 अरुणा ढेरे, ज्येष्ठ साहित्यिक
कुंकू म्हणजे परंपरेतली क्षमाशील, सहनशील अशी सत्वशीलता! टिकली म्हणजे स्वातंत्र्याची इच्छा करणारी आणि त्या दृष्टीने पुढे पाऊले टाकणारीआत्मविश्वासपूर्ण अशी स्निग्धता !! तर उन्मुक्त, मर्यादा सहज ओलांडणारी, साहसी आणि स्वच्छंदी अशी ती टॅटू!!!
भारतीय स्त्री जीवनाचा विचार केला तर अगदी अलीकडे पर्यंत तो सोशिकतेचा म्हणजे सीतेचाच चेहरा होता, तो द्रौपदीचा चेहरा फार कमी होता. पण आताकाळ झपाट्याने बदलतोय.
स्त्रीजीवनातील मोठी विसंगती म्हणूयात कि, ज्यात आपल्याला तीन पातळ्यांवरच्या स्त्रिया दिसतात. अजूनही परंपरेतलं सत्व घेऊन जगणारी स्त्री आपल्याभोवती नांदताना दिसते. खरंतर गेल्या पिढीतल्या स्त्रिया बऱ्याचशा अशाच होत्या. ज्यांनी आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलांचं आयुष्य आपल्या डोक्यावर झेललंआणि वाट काढली. प्रसंगी खंबीरपणे उभ्या राहिल्या... झुंजल्या... सगळ्या आव्हानांना तोंड देत पलीकडे गेल्या... त्यांनी कुठली स्त्रीमुक्तीची भाषा नाही केलीपण वेळ पडेल तेव्हा त्यांच्यातल्या त्या त्या शक्ती जाग्या झाल्या. आणि स्वातंत्र्याच्या काळापासून सगळीकडे त्यांनी आपल्या क्षमतांचं दर्शन घडवलं. यासगळ्या कुंकू परंपरेतल्या स्त्रिया मागच्या पिढीपर्यंत होत्या. यानंतर मधल्या काळातल्या स्त्रिया... ज्या प्रगतीच्या वाटेवरच्या स्त्रिया... यांना स्वतःची वाटघराबाहेर पडून चोखाळायची आहे. स्वतःच्या क्षमतांची पुरेपूर जाणीव आहे, आपली आवड, आपल्या इच्छा त्या जपू पाहतायत. घर संसाराबरोबरच त्या आपल्यालाहवं असलेलं मिळवू पाहतायत, काही नवं घडवू पाहतायत आणि सार्वजनिक जीवनात आपला अर्थपूर्ण सहभाग नोंदवू इच्छितात. यानंतरची नव्या पिढीतली