राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दांपत्याची मिफ२०१८ मध्ये चित्रपटनिर्मितीविषयक कार्यशाळा
मुंबई, 31 जानेवारी 2018
चित्रपटनिर्मिती हे केवळ तंत्रज्ञान नसून ती एक कला आहे, ज्यात आपल्याला कॅमेराच्या माध्यमातून आपली गोष्ट प्रेक्षकांना सांगता यायला हवी, असं मत सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते नंदन सक्सेना यांनी व्यक्त केलं. मुंबईत सुरु असलेल्या मिफ, म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. नंदन सक्सेना आणि कविता बहल ही नामवंत पत्रकार जोडी या महोत्सवात, चित्रपटनिर्मिती तंत्रज्ञानाविषयी एक कार्यशाळा घेत आहेत, त्या कार्यशाळेविषयी या दोघांनी माहिती दिली. या चार दिवसीय कार्यशाळेत, विद्यार्थ्यांना माहितीपट निर्मितीसाठीचे प्रशिक्षण, नैसर्गिक प्रकाशयोजनेचे ज्ञान, कॅमेरा आणि इतर उपकरणं हाताळणं, संकलन अशा तांत्रिक गोष्टी तर शिकता येतीलच, त्याशिवाय दुसरीकडे या दिग्दर्शकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतले चित्रपटनिर्मितीबद्दलचे अनुभव, त्यांचा दृष्टिकोन आणि ज्ञान याची माहितीही नवोदित चित्रपटनिर्मात्यांना मिळेल.
चित्रपटनिर्मिती तंत्रज्ञानाचं कुठलंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या या निर्मात्यांनी आपल्या अनुभवातून शिकत या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं आहे.
या कार्यशाळेविषयी माहिती देताना नंदन सक्सेना यांनी सांगितलं की यातून नवोदित निर्मात्यांना माहितीपटांविषयीचा अचूक दृष्टिकोन मिळेल. चित्रपटनिर्मिती ही काही अवघड गोष्ट नाही. तुम्हाला तुमच्या विषयाची समज असेल आणि तो मांडण्याचे धाडस अंगात असेल, तर तुम्ही कुठल्याही कॅमेराच्या मदतीने चित्रपट तयार करू शकता, असे सक्सेना यांनी सांगितलं. चित्रपटनिर्मिती क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे, विशेषतः तांत्रिक बाबतीत महिला रस घेतांना दिसत नाहीत, अशा कार्यशाळांतून महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देणं हा ही आमचा उद्देश असेल, असं मत कविता बहल यांनी यावेळी व्यक्त केलं. ही कार्यशाळा आज दुपारी चार वाजतापासून सुरु झाली.
नंदन सक्सेना आणि कविता बहल यांनी आपला पत्रकारितेचा व्यवसाय सोडून हे क्षेत्र निवडलं आहे. या निर्णयाविषयी बोलताना कविता बहल यांनी सांगितलं की व्यवसायानिमित्त त्यांना ईशान्य भारतात फिरण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्यांना खरा देश आणि माणसांचं वास्तव आयुष्य जवळून अनुभवता आलं. त्यावेळी , केवळ बातमी करण्यापेक्षा दुर्लक्षित जनतेच्या समस्या, त्यांचं आयुष्य, त्यांच्या व्यथा अधिक प्रभावी माध्यमातून मांडण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर या दोघांनी मागे वळून पाहिलं नाही.
या दोघांनी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला आणि त्या अनुभवाच्या आधारावर अनेक उत्तमोत्तम माहितीपटांची निर्मिती केली.. “कॉटन फॉर माय श्रौड”, “कँडल्स इन द विंड”,“डॅमड्”, “आय कॅनॉट गिव्ह यु माय फॉरेस्ट” या त्यांच्या माहितीपटांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शेतकरी आत्महत्या, लैंगिक विषमता,विधवांचे प्रश्न, आदिवासींच्या विस्थापन आणि पुनर्वसनाच्या समस्या, अशा संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या विषयांवर या दोघांनी बनवलेले चित्रपट, समीक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.