‘संस्कृती कलादर्पण’ चा त्रीदिवसीय नाट्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा नुकताच माटुंगाच्या यशवंत नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन स्टार प्रवाहाच्या हेड श्रावणी देवधर आणि म.न.से महिला प्रमुख शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेत्री स्मिता जयकर, विजय पाटकर, मिलिंद गवळी, अनंत पणशीकर, प्रदीप कबरे, नीता लाड, अक्षय बदरापुरकर, अक्षय कोठारी आदि उपस्थित मान्यवरांनी यावेळी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यंदा नाट्यमहोत्सवाचे १८ वे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला.
यंदा नाट्यविभागातून अंतिम फेरीसाठी पाच नाटकांची निवड झाली असून, यात ‘वेलकम जिंदगी’ (त्रिकूट,मुंबई), ‘संगीत देवबाभळी’ (भद्रकाली प्रॉडक्शन्स), ‘अनन्या’ (सुधीर भट थिएटर्स), ‘माकड’ (श्री स्वामी समर्थ आर्टस), ‘अशीही श्यामची आई’ (सुधीर भट थिएटर्स) या नाटकांचा समावेश आहे. नाट्य महोत्सवातील पहिले नाट्य पुष्प ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने गुंफले असून या महोत्सवाची सांगता ‘वेलकम जिंदगी’ या नाटकाद्वारे झाली. सर्वच नाटकांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून ‘संगीत देवबाभळी’ नाटकाला आलेल्या अनेक रसिक-प्रेक्षकांना प्रयोग हाऊसफुल्ल असल्याने परत जावे लागले.
अगदी अल्प दरामध्ये वर्षातली सर्वोत्कृष्ट नाटकं पाहण्याची पर्वणीच ‘संस्कृती कलादर्पण’मुळे मिळते. संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि अध्यक्ष-संस्थांपक चंद्रशेखर सांडवे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘संस्कृती कलादर्पण’ पुरस्कार सोहळा यंदाही चांगलाच रंगेल.