‘नृत्य-सजीव गीतरामायणा’ने रसिकांना घातली मोहिनी

ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या तसेच संगीतकार सुधीर फडके म्हणजेच सर्वांचे लाडके बाबूजी यांच्या प्रतिभा संगमातून अवतरलेल्या स्वये श्री रामप्रभू ऐकती...’, ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला...’, ‘शरयू तीरावरी अयोध्या...’, ‘स्वयंवर झाले सीतेचे...’ यांसारख्या गीत रामायणाच्या रचनांनी पुन्हा एकदा रसिकांचे कान तृप्त केले. रमेश देव प्रोडक्शन प्रा. लि. आणि सुबक यांची निर्मिती असलेलं नृत्य-सजीव गीत रामायण’ विजयादशमीच्या मुहूर्तावर षण्मुखानंद सभागृहात सादर करण्यात आलं. भक्तीरसाने ओतप्रोत भरलेल्या गीत रामायणाचे आजही असंख्य चाहते असून, ‘नृत्य-सजीव गीत रामायणच्या रूपात नृत्य आाणि अभिनयाचा नवा साज लेवून जेव्हा या गीतरचना नव्याने सादर करण्यात आल्यातेव्हा पु्न्हा एकदा रसिकांना मोहिनी घालण्यात यशस्वी ठरल्या.
निर्माते रमेश देव आणि सुनील बर्वे यांची निर्मिती असलेल्या नृत्य-सजीव गीत रामायणमध्ये गदिमांनी रचलेल्या रचना नृत्यगीत आणि संगीत यांचा अचूक मिलाफ घडवत सादर करण्यात आल्या. स्वये श्री रामप्रभू ऐकती...’ या गीताने सुरुवात झालेला हा गीत-संगीताचा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. यापूर्वी सुबकच्या माध्यमातून काळाच्या पडद्याआड गेलेल्या नाटकांना पुनरुज्जीवत केल्यानंतर गदिमा-बाबूजींचं गीत रामायण रंगभूमीवर आणणं हा धाडसी निर्णय होता असं मत सुनील बर्वे यांनी व्यक्त केलं. रमेश देवांसारख्या ज्येष्ठ अणि श्रेष्ठ कलावंताच्या साथीमुळेच हे शक्य झाल्याचंही सुनील बर्वे म्हणाले. आजच्या पिढीला रामायण काय आहे हे समजावं यासाठी गीत रामायणाला नृत्य आणि अभिनयाची जोड देण्यात आल्याचे रमेश देव यांनी सांगितले.
या कार्यक्रमातील सर्वच कलावंतगायकवाद्यवृंदांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याने गीत रामायण नव्या रूपात पाहताना एक वेगळाच आनंद लाभल्याचंही देव म्हणाले. सोनिया परचुरे यांनी सादर केलेल्या जटायू नृत्याचं देव यांनी विशेष कौतुक केलं. रसिकांची अशीच साथ लाभली तर भविष्यात याही पेक्षा भव्य दिव्य रूपात नृत्य सजीव गीत रामायणचे प्रयोग करण्यात येणार असल्याचे संकेतही देव यांनी दिले. 
निर्माता-दिग्दर्शक अभिनय देवअभिनेता-दिग्दर्शक अजिंक्य देवसीमा देव, सचिन खेडेकर, आनंद इंगळे, पुष्कर क्षोत्री   यांच्यासह चित्रपटसृष्टी आणि विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. नृत्य-सजीव गीत रामायणची संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे यांचं असून अतुल परचुरे यांनी याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत रावणवधाचं एक गीतही गायलं. सोनिया परचुरे आणि शरयू नृत्य कलामंदिरच्या शिष्यांनी कथ्थक नृत्याच्या आधारे गीत रामायणातील रचना सादर केल्या. अजित परबहृषिकेश रानडेविभावरी आपटे आणि शमिका भिडे यांनी बाबूजींच्या आवाजातील गीतरचना गात रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कमलेश भडकमकर यांनी या कार्यक्रमाचं संगीत संयोजन केलं.

Subscribe to receive free email updates: