‘कुठे हरवून गेले...’ गाण्याने साधला प्रमोशनचा नवा फंडा

मनाला स्पर्शणारे बोल.. कर्णमधुर संगीत.. आणि मंत्रमुग्ध करणारा तरल आवाज हे प्रत्येक यशस्वी चित्रपटाचे  गमक मानलं जातं. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्यातील गाणी जेव्हा रसिकांच्या ओठी रुळतात तेव्हा त्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच शिगेला पोहचते. सध्या अशीच उत्सुकता मराठी चित्रपटसृष्टीत पहायला मिळतेय, ती म्हणजे ‘Whats Up लग्न या चित्रपटाच्या निमित्ताने. ‘तू जराशी’ या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेस आणखी एक सुमधुर गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.
क्षितीज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘कुठे हरवून गेले..’ या हृदयस्पर्शी गीताला केतकी माटेगावकरच्या सुरेल आवाजाची साथ लाभली आहे तर ट्रॉय-आरिफ यांनी आपल्या जादुई संगीताने या गाण्याला चारचाँद लावलेत असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे या गाण्याच्या प्रसिद्धीसाठी एक नवा प्रमोशनल फंडा वापरला गेलाय.
‘कुठे हरवून गेले’ या गाण्याची उत्सुकता ताणून ठेवत निर्माते-दिग्दर्शकांनी या गाण्याचा चित्रपटातील व्हिडियो प्रसिद्ध न करता त्यासाठी एक खास व्हिडियो अल्बम बनवला आहे. ‘डान्स प्लस’ या गाजलेल्या  रिअॅलिटी शोमधील पल्लवी आणि ऋषभ ही जोडी अल्बमसाठी निवडली गेली. फुलवा खामकर यांच्या नृत्यदिग्दर्शनखाली या गाण्यावर सेन्शुअस कंटेम्परी डान्स स्टाईल कोरिओग्राफ केली असून या गाण्याची एक छोटीशी झलक सध्या तुम्ही व्हिडियो पॅलेसच्या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता.
‘कुठे हरवून गेले..’ हे संपूर्ण गाणं पाहण्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट पहावी लागणार असून म्युझिक चॅनेल्स, युट्यूब, सावन, गाना, विंग अशा विविध प्लॅटफॉम्सवर एकाचवेळी म्हणजेच ११ जानेवारीपासून हे गाणं आपल्याला पहाता-ऐकता येईल.
फिनक्राफ्ट मीडिया निर्मित, जाई जोशी आणि व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत ‘Whats Up लग्न या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरेची ही लव्हेबल केमिस्ट्री लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत पाहू शकाल. त्याआधी ‘Whats Up लग्न चित्रपटातील गाण्यांचा आनंद घेऊ.

Subscribe to receive free email updates: